बारामती, 19 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) बारामती परिसरातील नागरिकांना श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पालखी येत्या 20 जानेवारी रोजी बारामती शहरातील इंदापूर रोड येथील रयत भवन मार्केट यार्ड येथे येणार आहे. याठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी भाविकांनी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सद्गुरू श्री स्वामी समर्थ पादुका पालखी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सायंकाळी 5 वाजता पालखीचे आगमन
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पालखीचे उद्या सायंकाळी 5 वाजता बारामती शहरातील रयत भवन मार्केट यार्ड याठिकाणी आगमन होणार आहे. त्यानंतर याठिकाणी सायंकाळी ठीक 7 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती व नामस्मरण होणार आहे. आरती झाल्यानंतर तेथे रात्री 7:30 ते 11 वाजेपर्यंत सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत स्वामी भक्तीगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यावेळी बारामतीच्या माळेगाव येथील अरविंद देशपांडे यांच्या रागाज् म्युझिकल भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशीही महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार!
त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका बारामती शहरातील गुणवडी चौक येथील श्री स्वामी समर्थ मठ राजाभाऊ (काका) थोरात याठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना याठिकाणी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन आणि अभिषेक करता येणार आहे. अभिषेक करण्यासाठी नागरिकांनी दुधाची पिशवी घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पुढील गावी रवाना होणार आहेत.