बारामती, दि. 08 जुलै: (अभिजीत कांबळे) आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. या थोर संतांच्या पालख्या पंढरपूरला पोहचण्याच्या मार्गावर असून, या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी बांधवांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण सध्या भक्तीमय झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी (दि. 06 जुलै) संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात मुक्कामी होती.
मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी
बारामतीमध्ये शनिवारी संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखीच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. या सोबतच पालखीच्या स्वागतासाठी बारामती शहरात विविध पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील स्वागतकमानी आणि बॅनर्स लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाच्या कार्यकर्त्यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात लागल्याचे दिसून आले. मात्र, त्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे बॅनर बारामती शहरात अतिअल्प लागले असल्याचे जाणवले. त्यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी (शरद पवार गट) हा विधान सभेसाठी उदासिन तर नाही ना? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी द्यायची नाही, असा मानस तर नाही ना? दोन्ही पवार वेगवेगळे आहेत, असे सामान्य जनतेला दाखवून आपली पोळी भाजून घ्यायची नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
अशा पोस्टर्स बॉईजला सांगणार कोण?
तर दुसरीकडे, एका गटनेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील कसबा भागात देखील मोठ्या प्रमाणत बॅनर्स लागल्याचे दिसून आले. या निमित्ताने प्रश्न असा पडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाकडे केवळ बॅनरवर झळकण्यासाठीच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत का? तसे नसेल तर मग हेच कार्यकर्ते यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला नेमके कुठे गेले होते? आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी नक्की काम केले कुणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य बारामतीकरांमध्ये सध्या चर्चिला जाऊ लागला आहे. फक्त स्वागताचे आणि अभिनंदनाचे बॅनर्स झळकावून मत मिळत नसतात, तर जमिनीवर राहून सर्वसामान्यांची कामे करावी लागतात आणि ते जमत नसल्यास किमान नेत्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावी लागतात. पण हे अशा पोस्टर्स बॉईजला सांगणार कोण?