मुख्यमंत्री शिंदेंकडून बारामती येथील विकास कामांचे कौतुक!

बारामती, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच बारामती येथे आज विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, खासदार शरद पवार, सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी, या विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1763896104192549278?s=19

25 हजार रोजगार मिळेल: मुख्यमंत्री

“या नमो महारोजगार मेळाव्यात तरूणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल. यापूर्वी नागपूर, लातूर, अहमदनगर येथे मेळावे झाले असून बारामती येथील हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून, यातून 25 हजार युवकांना रोजगार मिळेल,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आज बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यातून स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडवण्याची संधी तरूणांना मिळाली आहे. राज्यातील तरुणांना 75 हजार रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली होती. आजवर 1 लाख तरूणांना रोजगार दिले असून आज याठिकाणी देखील 25 हजार तरूणांना रोजगार देण्यात येतील असे सांगितले. शासन आपल्या दारी मधूनही 2 कोटी 60 लाख नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळवून देण्यात आले आहेत,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बारामती विकासाचे मॉडेल: मुख्यमंत्री

बारामतीत उभ्या राहिलेल्या या इमारती विकासाचे मॉडेल आहे. या इमारतीत कुठेही दर्जाशी तडजोड केली गेलेली नाही. पोलीस हे प्रत्येक परिस्थितीत काम करत असतात त्यामुळे त्यांना चांगली घरे देणे गरजेचे आहे ते काम बारामती मध्ये झाले आहे. येथील बसस्टँड देखील मॉडेल बसस्टँड आहे. बारामतीमध्ये राज्यातील पहिले मॉडेल बसस्थानक झाले आहे. बारामतीचा विकास शरद पवार यांच्यासह अजित पवार यांनीही केला असून, यापुढे देखील येथील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *