7 हजार 72 उमेदवारांचे अर्ज वैध, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती

मुंबई, 31 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 ऑक्टोंबर 2024 पर्यंत होती. या कालावधीत राज्यभरातील 288 मतदारसंघात एकूण 7 हजार 995 उमेदवारांनी एकूण 10 हजार 900 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या उमेदवारी अर्जांची बुधवारी (दि.31) पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत 7 हजार 72 उमेदवारांचे 9 हजार 229 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तसेच 917 उमेदवारांचे 1 हजार 639 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर 11 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

https://x.com/CEO_Maharashtra/status/1851833740512891379?t=-Xf-3TdE1Cu9uHrH0_nBsA&s=19

नागपूर पश्चिम मध्ये 22 उमेदवारांचे अर्ज वैध

यामध्ये राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 50 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर यातील 917 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तसेच उर्वरित नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचवेळी येथील 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी गुरूवार, दि. 31 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

20 तारखेला मतदान

दरम्यान, राज्यात यंदा विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. हे मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. या मतदानाची मोजणी 23 नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची तसेच या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया आता समाप्त झाली आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतरच कोणकोणते उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत? हे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *