बारामती, 5 ऑगस्टः भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभुमीवर, जनतेच्या मनात या स्वतंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
बारामतीत भरधाव डंपरने 18 मेंढ्यांना चिरडले
त्याअनुषंगाने बारामती शहरातील प्रत्येक शासकीय / निमशासकीय कार्यालये, शाळा / महाविद्यालये, खाजगी संस्था यांनी आपल्या कार्यालयासमोर तसेच शहरातील प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरासमोर राष्ट्रध्वज उभारावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेने केले आहे. सदरहु अभियानाची माहिती जास्तीत जास्त नागरिक, संस्था, कार्यालये यांचेपर्यंत पोहचविण्याकरिता शहरात ठिकठिकाणी शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत लोकसहभाग घेवून प्रभात फेरीचे नियोजन केले आहे. तसेच नगरपरिषदेच्या घंटा गाड्यांवर अभियान विषयक गाणी वाजवण्यात येत आहेत.
शहरात वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी नगरपरिषदेमार्फत बॅनर लावून त्याद्वारे अभियानविषयक माहिती, तिरंगा फडकवण्याचे नियम, तिरंगा उपलब्ध होण्याचे ठिकाणे याबाबत माहितीचा प्रसार करण्यात येत आहे. तसेच शहरातील सर्व चित्रपट गृहांमध्ये चित्रपट दाखवण्यापूर्वी अभियानविषयक गाणी, जिंगल्स वाजवून सदर उपक्रमाचा प्रसार करण्यात येत आहे. शहरातील दूरदर्शन केबल मार्फत सदर अभियानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. बारामतीतील सर्व नागरिकांनी सदर अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होवून आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करणेबाबत बारामती नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात येत आहे.