बारामती, 9 जुलैः बारामतीसह राज्यात पावसाने जोर धरला आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले जाणार आहे. यामुळे बारामती शहरासह परिसरात एडिस एजिप्टाय या डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वृद्धी होण्याची शक्यता आहे. एडिस एजिप्टाय जातीच्या मादीमुळे डेंग्यू हा आजार होतो. यामुळे बारामती नगर परिषदेकडून नागरिकांना डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि आरोग्य अधिकारी आदित्य बनकर यांनी आवाहन केले आहे. शहराच्या मुख्य चौकात डेंग्यू आजाराचा प्रसार, लक्षणे, अपचार, तसेच डेंग्यू आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी उपाय सुचविले आहेत.
यात डेंग्यू आजाराची लक्षणे
– तीव्र ताप
– झटके
– गोवरसारखे अंगावर पुरळ
– डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी
– डोळ्याच्या आतील भाग दुखणे
– त्वचेखाली रक्तस्राव होणे
– डोळ्यातून व नाकातून पाणी गळणे
– रक्तदाब कमी होणे, शरीर थंड पडणे
– बेशुद्धावस्था
उपचार
– आराम करावा
– तापात आयबुप्रोफेने घेऊ नये
– त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरचा सल्ला घ्यावा
डेंग्यू तापाच्या रुग्णालयात उपचारासाठी विलंब झाल्यास मृत्यू उडू शकतो. त्यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टर कडे जा.
उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, शहारातील डास उत्पत्ती स्थाने नष्ट करा!
डेंगू आजार टाळण्यासाठी ‘हे’ करा
– आठवड्यातील एक दिवस घरातील पाण्याची भांडी कोरडी करा व आतून स्वच्छ घासून पुसून घ्या
– आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेल्या सर्व भांडे रिकामे करून घासून पुसून कोरडी करा.
– घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवा. झाकण नसल्यास कपड्याने झाका.
– घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा. – डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवावा व झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
– आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणे.
– आपल्या घरात किंवा अवतीभवती नळगळती असू नये.
– घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदलणे.
– बिल्डींगमधील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेले असणे.
– खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवणे.
लक्षात ठेवा
डेंगू आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच एकमेव पर्याय आहे. कोरडा दिवस पाळू, डेंगू आजार टाळू!!
1) डेंग्यू ताप
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
– एकदम जोराचा ताप चढणे
– डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
– डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
– चव आणि भूक नष्ट होणे
– छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
– मळमळणे आणि उलट्या
– त्वचेवर व्रण उठणे
२) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ)
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव – चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
3) तीव्र, सतत पोटदुखी
त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे
नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे
रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे
झोप येणे आणि अस्वस्थता
रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते
नाडी कमकुवतपणे जलद चालते
श्वास घेताना त्रास होणे
4) डेंग्यू अतिगंभीर आजार
ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
औषधे
या विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. डेंग्यू हा व्हायरल आजार असल्याने त्यावर औषध उपलब्ध नाही. परंतु डेंग्यूमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते व ते पोटात तसेच छातीत जमा होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे रुग्णाला सलाईन लावण्यात येत असतात. शरीरातील प्लेटलेट जास्त प्रमाणात कमी झाल्यास रुग्णाला प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट लावाव्या लागतात.