बारामती, 13 ऑक्टोबरः सध्या शेतकऱ्यांचे पशुधन लम्पी स्किन आजाराने त्रस्त झालेले आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष भारती यांनी केले.
बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील ग्रामपंचायत सभागृहात 12 ऑक्टोबर 2022 रोजी रब्बी हंगामातील शेतकरी व पशुपालक प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. भारती बोलत होते.
बारामतीत दान उत्सवासाठी नागरीकांना आवाहन
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, मंडळ कृषी अधिकारी अरविंद यमगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, कृषी सहाय्यक संतोष पिसे, माधुरी पवार, योगिता सांगळे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव यांच्यासह उंडवडी सुपे परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
डॉ. भारती म्हणाले, लम्पी रोगाचा प्रसार हा माशा, मच्छर आणि गोचीड आदींच्या माध्यमातून होतो. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोठ्यामध्ये लिंबाच्या पाल्याचा धूर करून गोठा निर्जंतुकीकरण करून घ्यावा. लम्पी रोगाबाबत शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गाईचे दूध मानवासाठी खाण्यायोग्य असून त्याचा मानवी शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असे सांगून लम्पी स्कीन रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
मुर्टीमधील पावसाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!
तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करून विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव यांनी दुग्ध उत्पादनातील वाढ, मुक्त संचार गोठा व मुरघास तंत्रज्ञान आदी विषयावर मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक संतोष पिसे यांनी हरभरा पिकाचे लागवड तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.