बारामती, 10 मेः बारामती नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुक 2022 मध्ये होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिद्ध करण्यासाठी सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. या सुधारीत कार्यक्रमानुसार, बारामती नगर परिषदेने प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर 10 मे 2022 (मंगळवार) ते 14 मे 2022 (शनिवार) पर्यंत कार्यालयीन वेळेत आक्षेप हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. तरी उक्त प्रभाग रचनेच्या मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती/ सूचना असतील त्यांनी त्या पुराव्यासह संबंधित मुख्याधिकारी यांचेकडे दि. 14 मे, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही.
विहीत कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर जिल्हाधिकारी हे 23 मे 2022 (सोमवार) पर्यंत कार्यवाही करणार आहेत. तसेच प्राप्त हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे 30 मे (सोमवार) पर्यंत अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त हे 6 जून 2022 (सोमवार) रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील. बारामती शहराची अंतिम प्रभाग रचना ही प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्येवर ठरविण्यात येणार आहे. तसेच अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना ही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे वृत्तपत्रे, स्थानिक पातळी, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषदेच्या वेबसाईटवर 7 जून 2022 (मंगळवार) पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेच्या मसुद्यावर हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरीकांना सुनावणीकरीत उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले आहे.