अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा बनले आई-बाबा! सोशल मीडियावरून दिली गोड बातमी

मुंबई, 20 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे जोडपे दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने 15 फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आज सोशल मीडियावरून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव देखील उघड केले आहे. या जोडप्याने आपल्या बाळाचे नाव अकाय असे ठेवले आहे. तत्पूर्वी, विराट आणि अनुष्का या जोडप्याला वामिका नावाची एक मुलगी देखील आहे.

https://twitter.com/imVkohli/status/1759962813626491369?s=19

अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याच्या रंगल्या होत्या चर्चा!

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अशातच विराट कोहलीने सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. त्यामुळे अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आले होते. मात्र, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्याची आजवर कोठेही वाच्यता केली नव्हती. दरम्यान, अनुष्का शर्माने आता मुलाला जन्म दिल्यानंतर विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत का खेळला नाही? याचे कारण स्पष्ट झाले आहे.

विराट-अनुष्काने पोस्टमध्ये काय म्हटले?

विराट आणि अनुष्काने आपल्या मुलाच्या आगमनाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करून दिली आहे. “आम्हाला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, 15 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचे अर्थात वामिकाचा लहान भाऊ ‘अकाय’ चे स्वागत केले आहे. आमच्या आयुष्यातील या गोड क्षणादरम्यान आम्हाला तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. प्रेम आणि कृतज्ञता.” असे या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या गोड बातमीमुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *