मुंबई, 11 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आणि हाजी अली आंतरबदलातील आर्म 8 (लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तर वाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल) हा आजपासून तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर हा पुल या प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आठवड्यातील दर शनिवारी आणि रविवारी अशा दोन दिवशी बंद राहणार आहे, याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
https://x.com/mybmc/status/1811044460450726094?s=19
मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी या प्रकल्पाच्या सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या या टप्प्याच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पूर्व उपनगरांचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी यांच्यासह विविध अधिकारी, सल्लागार व कंत्राटदार उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या कामाच्या संदर्भात विविध प्रकारच्या सूचना दिल्या.
https://x.com/mieknathshinde/status/1810999723177783712?s=19
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा
मुंबई सागरी किनारा मार्गाचे काम जसजसे पूर्ण होत आहे, तसतसे एक एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. त्यानुसार हाजी अली ते खान अब्दुल गफार खान हा मार्गही वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सागरी किनारा मार्गाचे 91 टक्के काम पूर्ण झाले असून, या मार्गाला वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील 3 आठवड्यात हे काम पूर्ण झाल्यावर नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अधिक वेगाने कापणे मुंबईकरांना शक्य होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. तर प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.