बेंगळुरू, 21 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसदेतील घुसखोरीच्या प्रकरणात आणखी एका जणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. साईकृष्ण जगाली असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. साईकृष्ण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो कर्नाटकातील एका कंपनीत कामाला आहे. तो मूळचा कर्नाटक येथील बागलकोटचा रहिवासी आहे. साईकृष्णला त्याच्या बागलकोट येथील घरातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, साईकृष्ण हा संसदेत घुसखोरी करणाऱ्या मनोरंजन डी याचा मित्र आहे. ते दोघे बेंगळुरूच्या बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात वर्गमित्र होते. पोलिसांनी सांगितले की, साईकृष्ण आणि मनोरंजन हे दोघे 2008-2009 या कालावधीत रूममेट होते.
https://twitter.com/ANI/status/1737699468219449532?s=19
संसद घुसखोरी प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 13 डिसेंबर रोजी संसदेचे कामकाज सुरू असताना सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक लोकसभेत उडी मारली. त्यानंतर त्यांनी बाकांवर उड्या मारत स्मोक कॅन्डलमधून पिवळा धूर सोडला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर संसदेच्या बाहेर निलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी अशाच प्रकारे स्मोक कॅन्डलमधून धूर सोडत आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना देखील अटक केली. या चौघांना 14 डिसेंबर रोजी कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने या चौघांना आणखी 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
https://twitter.com/ANI/status/1737761185783836737?s=19
तसेच या घटनेनंतर, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात ललित झा आणि महेश कुमावत नावाच्या आणखी दोघांनाही अटक केली होती. 15 डिसेंबर रोजी दिल्ली न्यायालयाने ललित झा याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ललित झा हा संसद घुसखोरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याने संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांचे फोन नष्ट केले असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले होते. सध्या या घटनेचा दिल्ली पोलीस कसून तपास करीत आहे.