कुर्ला बेस्ट बस अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या 8 झाली

मुंबई, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील कुर्ला परिसरात 9 डिसेंबर रोजी एका बेस्ट बसने रस्त्यावरील अनेक लोकांना चिरडले होते. या अपघातातील मृतांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका 52 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी (दि.16) सकाळी मृत्यू झाला आहे. फझलू रहमान शेख असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते घाटकोपर परिसरातील रहिवासी होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची माहिती पोलीस उपायुक्तांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

https://x.com/ANI/status/1868613487771168977?t=T7fvMRqbJBtaJXWyfRRV3Q&s=19

चालकाला 21 डिसेंबरपर्यंत कोठडी

मुंबईतील कुर्ला परिसरात एका बेस्ट बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना आणि लोकांना उडवले होते. ही घटना 9 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी कुर्ला बस अपघातातील आरोपी चालक संजय मोरे याला येत्या 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या विरोधात सदोष मनुष्‍यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकार, बेस्टकडून आर्थिक मदत जाहीर

मुंबईतील कुर्ला पश्चिम बसस्थानक ते अंधेरी पूर्व बसस्थानक या मार्गावरून ही बेस्ट बस (क्र. एम एच 01 ईएम 8228) जात होती. अचानकपणे चालकाचे या बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी बेस्टने मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे. तसेच बेस्टने या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रमा यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने देखील या अपघात मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *