डोंबिवलीत आणखी एक स्फोटाची घटना, नऊ जण जखमी

डोंबिवली, 29 मे: (विश्वजीत खाटमोडे) डोंबिवली परिसरात आज पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडली आहे. डोंबिवलीतील टंडन रोड येथील खाद्यपदार्थांच्या स्टॉल वरील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी मधील अमूदान कंपनीतील स्फोटाची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा येथे स्फोटाची घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1795820661920899123?s=19

गॅस सिलिंडरचा स्फोट

याठिकाणी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर असलेल्या गॅस सिलिंडरचा अचानकपणे स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी याठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या ही आग विझवण्यात आली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या याचा तपास केला जात आहे.

केमिकल कंपनीत झाला होता स्फोट

तत्पूर्वी डोंबिवली एमआयडीसी मधील अमूदान कंपनीत 23 मे रोजी मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्यामुळे त्या परिसरातील अनेक इमारती आणि गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. तसेच या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला होता. या दुर्घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, या प्रकरणात कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत आता आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तर कंपनीतील स्फोटात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *