नवी दिल्ली, 29 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) बीसीसीआयने आपला क्रिकेटपटूंच्या सोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने या करारातून श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यापूर्वीच्या करारामध्ये श्रेयस अय्यर B श्रेणीत होता. तर ईशान किशन हा C श्रेणीमध्ये होता. या दोघांना आता बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले आहे. त्यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी, या करारातून श्रेयस अय्यरला एका वर्षाला 3 कोटी रुपये मिळत होते. तसेच ईशान किशन याला एका वर्षाला 1 कोटी रुपये मिळत होते. मात्र, या दोघांना बीसीसीआयने वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
https://twitter.com/BCCI/status/1762816089862398354?s=19
बीसीसीआयचा वार्षिक खेळाडू करार
बीसीसीआयने क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना A+ श्रेणी देण्यात आली आहे. त्यानुसार, या खेळाडूंना आता वर्षाला 7 कोटी रुपयांचे मानधन मिळणार आहे. तसेच, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांना A श्रेणी देण्यात आली आहे. त्यानुसार, या खेळाडूंना एका वर्षाला 5 कोटी रुपये मिळणार आहेत. तर या वार्षिक करारामध्ये सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल यांना B श्रेणी मिळाली आहे. त्यानुसार, या खेळाडूंना आता एका वर्षाला 3 कोटी रुपये दिले जाणार आहेत. सोबतच रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांना C श्रेणी देण्यात आली आहे. त्यानुसार, या खेळाडूंना आता एका वर्षाला 1 कोटी रुपयांचे मानधन मिळणार आहे.
ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांना संधी मिळणार?
दरम्यान, स्टार यष्टीरक्षक ध्रुव जुरेल आणि धडाकेबाज फलंदाज सर्फराज खान यांना अजूनही C श्रेणीमध्ये स्थान मिळण्याची संधी आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या हंगामात 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूचा C श्रेणीमध्ये समावेश केला जाईल. त्यामुळे ध्रुव जुरेल आणि सरफराज खान, जे आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी धर्मशाला येथील इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भाग घेतल्यास त्यांचा C श्रेणीमध्ये आपोआप समावेश होणार आहे.
या खेळाडूंना करारातून वगळले!
तर यापूर्वीच्या करारात श्रेयसला B श्रेणीत आणि ईशानला C श्रेणीत ठेवण्यात आले होते. त्यांना आता या करारामधून वगळण्यात आले आहे. तसेच चेतेश्वर पुजाराला (B श्रेणी) या करारातून वगळण्यात आले आहे. याशिवाय उमेश यादव, शिखर धवन, दीपक हुडा आणि युझवेंद्र चहल (C श्रेणी) यांना देखील या करारातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.