नवी दिल्ली, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा देशातील 132 मान्यवरांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 मान्यवरांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. या पुरस्कारांची घोषणा 1954 पासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. पाहा पद्म पुरस्कारांची संपुर्ण यादी
राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान केला जातो
साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान यासह अनेक क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या आणि विशेष कार्य करणाऱ्यांना पद्म पुरस्कार दिले जातात. दरवर्षी राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जातो. यावेळी पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पद्म पुरस्कार हा भारतरत्न नंतर भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्रातील या व्यक्तींना पद्मभूषण जाहीर
यावेळी महाराष्ट्रातील 12 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 6 पद्मभूषण आणि सहा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्रातील होर्मुसजी कामा (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता), अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा (कला) आणि कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राज्यातील या व्यक्तींना मिळाला पद्मश्री!
तसेच ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर (समाजकार्य), मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे (क्रीडा), डॉ.मनोहर कृष्णा डोळे (वैद्यकीय), झहीर काझी (साहित्य आणि शिक्षण), चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (वैद्यकीय), कल्पना मोरपारिया (व्यापार आणि उद्योग) या 6 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.