नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार

दिल्ली, 13 जून: (विश्वजीत खाटमोडे) नीट यूजी 2024 या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भातील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान एनटीएने नीट यूजी 2024 परीक्षेतील ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टासमोर सांगितले आहे. त्यामुळे निकाल रद्द करण्यात आलेल्या 1563 विद्यार्थ्यांची आता पुन्हा एकदा नव्याने परीक्षा होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली.

https://twitter.com/ANI/status/1801121007962554873?s=19

https://twitter.com/ANI/status/1801125116236967961?s=19

23 जूनला पुन्हा परीक्षा

त्यानुसार, ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची परीक्षा 23 जून रोजी परीक्षा होणार आहे. तर या परीक्षेचा निकाल 30 जूनपूर्वी जाहीर होणार आहे. तसेच त्यानंतर या विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणार आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले आहेत. अशा विद्यार्थ्यांना एनटीएने दोन पर्याय दिले आहेत. एकतर हे विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसू शकतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची नसेल त्यांना अतिरिक्त गुणांशिवाय स्कोअरकार्ड देण्यात येणार आहे. तर आजच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने समुपदेशन प्रक्रिया थांबवण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे. तसेच परीक्षा रद्द करण्याची मागणीही सुप्रीम कोर्टाने यावेळी फेटाळून लावली आहे.

https://twitter.com/ANI/status/1801126660340945256?s=19

1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स

नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएने 4 जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले आहेत. यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळाले आहेत. त्यावरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. तत्पूर्वी, यंदा नीट परीक्षेला बसलेल्या 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले. हे अतिरिक्त गुण मिळाल्यामुळे मेरिटबाहेर असलेली अनेक मुले मेरिटमध्ये आली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणे अवघड झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *