अहमदाबाद, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) महागाईचा सामना करत असलेल्या देशातील जनतेला आणखी एक धक्का बसला आहे. अमूल डेअरी मिल्कने आपल्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अमुल दुध आता लिटरमागे 2 रुपयांनी महाग झाले आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल कंपनीच्या जवळपास सर्वच दुधाच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवल्या आहेत. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती यांचा समावेश आहे. जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1797317374405702075?s=19
पाहा दरवाढ झाल्यानंतरची किंमत
या दर वाढीनंतर, देशातील जनतेला एक लिटर अमूल दुधासाठी आता 66 रुपये मोजावे लागणार आहेत. तर अमूल गोल्ड 500 मिली पॅकची किंमत 32 रुपयांऐवजी 33 रुपये इतकी झाली आहे. अमूल ताझा 500 मिलीची किंमत आता 26 रुपयांवरून 27 रुपयांपर्यंत वाढणार आहे. तसेच अमूल शक्ती 500 मिलीची किंमत 29 रुपयांवरून 30 रुपये इतकी वाढणार आहे. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्याचा निकाल उद्या लागणार आहे. तर निवडणुकीच्या निकालापूर्वी अमूलने सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. अमूलच्या दरवाढीचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. दरम्यान, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 2 रुपये प्रति लिटर वाढ म्हणजे एमआरपीमध्ये 3 ते 4 टक्के वाढ, जी सरासरी अन्न महागाईपेक्षा खूपच कमी आहे. तर अमूलने फेब्रुवारी 2023 पासून प्रमुख बाजारपेठांमध्ये ताज्या दुधाच्या पॅकच्या किमती वाढवल्या नव्हत्या, असे देखील त्यांनी यामध्ये सांगितले आहे.