अहमदाबाद, 24 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अमूलने आपल्या ग्राहकांना दिलासा देत, आपल्या तीन प्रमुख दूध ब्रँड्समध्ये किंमतीत कपात केली आहे. अमूल दूध कंपनीच्या अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल टी स्पेशल यांच्या 1 किलो पॅकच्या किमतीत एक रुपयांची कपात करण्यात आल्याची माहिती गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी शुक्रवारी (दि.24) दिली आहे. दरम्यान, ही कपात संपूर्ण भारतात असणार आहे.
https://x.com/ANI/status/1882733857025519738?t=yQB2HRex5-HjtGy1DAOlIg&s=19
पाहा दुधाच्या किंमती
अमूलने नवीन किमती जाहीर केल्यानंतर अमूल गोल्ड दूध 66 रुपये प्रति लिटरऐवजी 65 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, अमूल ताजाची किंमत 54 रुपयांवरून 53 रुपये केली जाईल. अमूल टी स्पेशल दूधाच्या 1 लिटर पॅकची किंमत 62 रुपयांवरून 61 रुपये केली जाईल. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढत्या महागाईपासून थोडा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
अमूलचा हा निर्णय ग्राहकांसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर या निर्णयामुळे अमूलला बाजारपेठेत अधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या बदलामुळे अमूलच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा असून, ग्राहकांमध्ये ब्रँडबद्दलची सकारात्मक भावना निर्माण होण्याचा अंदाज आहे. किमतीतील कपात ही स्पर्धात्मक बाजारपेठेत इतर कंपन्यांसाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे इतर दूध कंपन्या देखील आपल्या दुधाचे भाव कमी करण्याची शक्यता आहे. याचा फायदा ग्राहकांना नक्कीच होईल.