अमित ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई, 28 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.28) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या निवडणुकीत अमित ठाकरे यांना मनसेने मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अमित ठाकरे हे आज सकाळीच रवाना झाले. याप्रसंगी अमित ठाकरे यांची पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://x.com/mnsadhikrut/status/1850861663139823771?t=6IkMuELiClWPWQRRRQ16hw&s=19

राज ठाकरेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित ठाकरे यांनी यावेळी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. तसेच त्यांनी यावेळी शिवाजी पार्क वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन केले. सोबतच त्यांनी दादर येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी अमित ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यानंतर अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासह सर्व कुटुंबियांच्या उपस्थित आपला उमेदवारी अर्ज केला.

माहीम मध्ये तिरंगी लढत?

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरे यांची उमेदवार म्हणून ही पहिलीच निवडणूक आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर हे माहीम मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी सदा सरवणकर यांना त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी शिवसेनेकडून सांगितले जाण्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सदा सरवणकर हे कोणती भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *