माहीम मध्ये अमित ठाकरे यांचा पराभव

माहीम, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील माहीम मतदारसंघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी 1 हजार 316 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत माहीममध्ये मनसेचे अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेना पक्षाचे सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत हे नेते उभे होते. त्यामुळे या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

https://x.com/amitrthackeray/status/1860276955309883492?t=t7RjoVEwzJ40aW8zLBTDpA&s=19

अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर

माहीम विधानसभा मतदारसंघातील अटीतटीच्या या सामन्यात महेश सावंत यांना सर्वाधिक 50 हजार 223 मते मिळाली. त्यानंतर सदा सरवणकर यांना 48 हजार 897 मते, तर अमित ठाकरे यांना 33 हजार 062 मते मिळाली. त्यामुळे अमित ठाकरे हे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना या निवडणुकीत स्वतःची छाप पाडता आली नाही. दरम्यान, अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक होती.

जनतेने दिलेला कौल मान्य: अमित ठाकरे

निवडणुकीतील या पराभवानंतर अमित ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे म्हटले आहे. “माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. मी वचन देतो की, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू! तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी 24 तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही.” असे ट्विट अमित ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *