दिल्ली, 14 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे. त्यानिमित्त देशभरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यासाठी देशभरात सध्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य अनेक नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
https://x.com/narendramodi/status/1911608647504822417?t=BIAYRzjmhA8l5o5QA2wGoQ&s=19
पीएम मोदी यांच्याकडून अभिवादन
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिले, “सर्व देशवासियांच्या वतीने भारत रत्न पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटि-कोटि नमन. त्यांच्या प्रेरणेमुळेच देश आज सामाजिक न्यायाच्या स्वप्नपूर्तीसाठी समर्पण भावनेने कार्यरत आहे. त्यांचे विचार आणि मूल्ये आत्मनिर्भर व विकसित भारताच्या निर्माणास बळकटी आणि गती देणारे आहेत.”

राष्ट्रपतींची पोस्ट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आपल्या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व देशवासीयांना मनापासून शुभेच्छा देते. बाबासाहेबांनी त्यांच्या प्रेरणादायी जीवनात प्रचंड अडचणींना तोंड देऊनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि त्यांच्या असाधारण कामगिरीमुळे जगभरात आदर मिळवला. शिक्षणामुळे समाजात बदल होतो आणि गरीब लोक मजबूत होतात असे ते मानत होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील त्यांचे महत्त्वाचे काम येणाऱ्या पिढ्यांना देश घडवण्यासाठी प्रेरणा देत राहील. चला तर मग, या दिवशी आपण सगळे मिळून डॉ. आंबेडकरांच्या शिकवणी आणि चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार करूया.”
अमित शाह यांचे ट्विट
गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “शिक्षणाच्या, समानतेच्या आणि न्यायाच्या जोरावर सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर आयुष्यभर गरीब आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारलेले संविधान बनवून त्यांनी भारताच्या महान लोकशाही परंपरेला भक्कम पाया दिला. न्यायपूर्ण आणि समान समाज निर्माण करण्याच्या दिशेने बाबासाहेबांचे विचार आजही आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात. महान संविधान शिल्पकार आणि करोडो देशवासियांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक असणाऱ्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमस्कार करतो.
राहुल गांधींनी केले अभिवादन
“भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी, प्रत्येक भारतीयाच्या समान हक्कांसाठी, प्रत्येक वर्गाच्या सहभागासाठी त्यांचे संघर्ष आणि योगदान, संविधानाच्या रक्षणाच्या लढाईत आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करेल.” असे ट्विट काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.
देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 एप्रिल रोजी देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने विविध शहरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले योगदान यावेळी विशेषतः स्मरणात ठेवले जात आहे.