बंगळुरू, 29 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बंगळुरू येथे वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत 2025 च्या आयपीएल लिलावासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आयपीएलच्या 2025 च्या हंगामासाठी लवकरच मोठा लिलाव (मेगा ऑक्शन) पार पडणार आहे. त्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत 8 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, आयपीएलच्या पुढील लिलावात राईट टू मॅच कार्ड (RTM) वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच 2025 ते 2027 या कालावधीत इम्पॅक्ट प्लेयरचा देखील नियम लागू राहणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. परंतु, यावेळी मेगा ऑक्शनच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही.
https://x.com/IPL/status/1840079169020932146?t=HOEDE_txy3G5xhzuYJ4R_g&s=19
पर्सची मर्यादा 120 कोटी रुपये असणार
यासोबतच, आयपीएलच्या लिलावाआधी 10 संघांचे फ्रँचायझी त्यांच्या संघात प्रत्येकी 6 खेळाडू ठेऊ शकतात. हे एकतर रिटेंशनद्वारे किंवा राईट टू मॅच कार्ड वापरून असू शकते. यामध्ये फ्रँचायझींना त्यांच्या संघात जास्तीत जास्त 5 कॅप खेळाडू आणि जास्तीत जास्त 2 अनकॅप केलेले खेळाडू ठेवता येतील. तसेच 2025 च्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक संघांच्या पर्सची मर्यादा 120 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी पर्सची मर्यादा 100 कोटी रुपये होती. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, आयपीएलच्या पुढील हंगामातील सामन्यात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एका सामन्यासाठी 7.50 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त असणार आहे आणि हे पैसे फ्रँचायझीच देतील.
अशा खेळाडूंवर कारवाई होणार
दरम्यान, एखादा खेळाडू आयपीएलच्या लिलावात नोंदणी करतो आणि निवड झाल्यानंतर तो सीझन सुरू होण्यापूर्वी स्वतःला खेळण्यास अनुपलब्ध असल्याचे जाहीर करतो. अशा खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत भाग घेण्यास आणि खेळाडूंच्या लिलावात नाव नोंदविण्यास 2 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मेगा ऑक्शनसाठी परदेशी खेळाडूंना स्वतःच्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये एखाद्या परदेशी खेळाडूने नोंदणी केली नाही तर, तो पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात नोंदणीसाठी अपात्र ठरणार आहे.
धोनी अनकॅप्ड खेळाडू?
सोबतच या बैठकीत बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या खेळाडूने गेल्या पाच वर्षात एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. अशा खेळाडूंचा अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघात महेंद्रसिंह धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसू शकतो. कारण, धोनीने गेल्या 5 वर्षात एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना, एकदिवसीय, टी-20 सामना खेळलेला नाही.