गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी सातारा जिल्ह्यात 620 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप

मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमधील अहमदाबाद येथील जीएसटीचे मुख्य आयुक्त चंद्रकांत वाळवी यांनी सातारा जिल्ह्यात 620 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चंद्रकांत वाळवी यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील कांदाटी खोऱ्यातील एका गावात 620 एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रकांत वाळवी हे मूळचे नंदूरबारचे रहिवासी असून, ते सध्या अहमदाबादमध्ये जीएसटीचे मुख्य आयुक्तपदी कार्यरत आहेत.

गावातील 620 एकर जमीन खरेदी केली?

चंद्रकांत वाळवी यांनी त्यांच्या काही नातेवाईकांसोबत मिळून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी या गावात तब्बल 620 एकर जमीन खरेदी केल्याचा दावा करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई झाली नाही तर, येत्या 10 जूनपासून साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संजय मोरे यांनी दिला आहे. या प्रकारामुळे पर्यावरण संरक्षण कायदा 1986, वन संरक्षण कायदा 1976 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे नियमित उल्लंघन केले जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

भीती दाखवून जमीन खरेदी केल्याचा दावा

चंद्रकांत वाळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी “तुमची वडिलोपार्जित गावातील जमीन सरकार घेणार आहे,” अशी भीती गावकऱ्यांना दाखवून झाडाणी गावातील 620 एकर जमीन गावकऱ्यांकडून खरेदी केली असल्याचा आरोप संजय मोरे यांनी केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *