मुंबई, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवीन नियम लागू केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक शाळेतील शिक्षकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांप्रमाणेच गणवेश परिधान करावा लागणार आहे. हा नियम सरकारी शाळांच्या शिक्षकांसह खासगी शाळांच्या शिक्षकांनाही लागू असणार आहे, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
असा असणार गणवेश
राज्यातील शाळांनी त्यांच्या सर्व शिक्षकांसाठी ड्रेस कोड ठरवावा, असे राज्य सरकारने या आदेशात म्हटले आहे. महिला शिक्षकांनी सलवार, कुर्ता, दुपट्टा किंवा साडी घालावी. पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट घालावी. सोबतच शिक्षकांनी शर्ट इन करावा. पुरुष शिक्षकांच्या गणवेशात फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पॅन्ट असावी. असेही या आदेशात सांगण्यात आले आहे. तसेच पुरुष आणि महिला शिक्षकांनी कोणती पादत्राणे घालावीत? याचा देखील नियम करण्यात आला आहे. पुरुष शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे बुट घालावेत. तर महिला शिक्षकांनी देखील विशिष्ट चप्पल घालून शाळेत येण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत.
जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी
त्याचवेळी शिक्षकांना शाळेत जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षकांचा पेहराव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असून, त्याचा इतरांवर प्रभाव पडत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षकांनी त्यांच्या पदानुसार गणवेश परिधान करणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.