मुंबई, 09 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना दिला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. तर या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते.
तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला!
त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळेच्या वेळेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या तज्ज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होणार
दरम्यान, सकाळी 7 वाजता शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही. याचा विद्यार्थ्यांच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच शरीराला झोप पूर्ण न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासातील उत्साह कमी पडतो. याशिवाय, झोप पूर्ण झाली नसल्यामुळे विद्यार्थी अनेकदा आजारी पडतात. असे या समितीच्या अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.
One Comment on “राज्यातील चौथी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊ नंतर भरणार! शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय”