मुंबई, 26 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर वरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. भाजपने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच महिला कुस्तीपटूंवरील अत्याचार प्रकरणातील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचे एन्काउंटर का केले नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1838898527306440960?s=19
न्यायालयीन चौकशी करावी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले आहे. अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता, त्याआधीच त्याला संपवण्यात आले आहे. त्यामुळे एन्काऊंटर प्रकरणाची न्यायिक चौकशी करावी अशी आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
फाशी देण्याची ही पद्धत का?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरूंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.” खरं तर मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यात फासावर लटकवू असं सांगितले होते. त्यांची फाशी देण्याची पद्धत अशी आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
बेड्या लावलेल्या हाताने बंदूक कशी खेचली?
ज्या प्रकारे पोलिसांनी प्रेस नोट काढली त्यामधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात. अक्षय शिंदेला तुरूंगातून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याच्या चेहऱ्याला मास्क घातलेले असून हाताला बेड्या लावल्या आहेत. तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवले असेल तर मग त्याने बेड्या लावलेल्या हाताने बंदूक कशी खेचली? त्याला वाहनातून नेताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोलीस बसले होते का? ते बसले असतील तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला? आरोपीने बंदुकीचे लॉक कसे उघडले? ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली गेली? असे एक नाही अनेक सवाल उपस्थित होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार यांचे प्रश्न
पोलिसांनी प्रेस नोटमध्ये स्वसंरक्षणार्थ शब्द वापरला आहे. एकाच गोळीत त्याचा मृत्यू झाला. ती गोळी त्याला ताब्यात घेण्यासाठी चालवली होती, की त्याला मारण्यासाठी चालवली होती? कैद्याला ने-आण करण्याचे काम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे नसते. त्यांचे काम तपास करणे असते. मग कैद्यांना ने-आण करण्यासाठी असे अधिकारी का नेमले? हे अधिकारी नेमण्यामागचा उद्देश काय होता? असे प्रश्न देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.