मुंबई, 24 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर येथे गेल्या महिन्यात एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. याच आरोपीचा पोलिसांनी सोमवारी (दि.23) एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. त्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे प्रकरण संशयास्पद असून त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी एन्काऊंटरचा बनाव रचला आहे की काय? असा सवाल विरोधकांनी केला आहे.
https://x.com/ANI/status/1838245416334434512?s=19
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? असे अनेक सवाल काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत. बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! ही आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
https://x.com/NANA_PATOLE/status/1838275221016531399?s=19
न्यायालयीन चौकशी करावी: नाना पटोले
यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील याप्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला कायद्याने कठोर शिक्षा व्हायला हवी होती, याबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. पण एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना, पोलीस अधिकाऱ्याचीच बंदूक हिसकावून घेऊन गोळीबार करतो, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, त्या आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा डाव आहे का? असे नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
https://x.com/AnilDeshmukhNCP/status/1838221268828537294?s=19
अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या एन्काऊंटर विषयी संशय व्यक्त केला आहे. बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर केला आहे.