मुंबई, 25 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस एन्काऊंटर मध्ये हत्या झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अक्षय शिंदे याचे वडील अण्णा शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या एन्काऊंटर प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे. तसेच दाखल केलेल्या या याचिकेत त्यांनी आपल्या मुलाला बनावट एन्काऊंटर मध्ये मारल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या याचिकेवर आज (दि.25) सुनावणी झाली.
https://x.com/ANI/status/1838847777360564437?s=19
हायकोर्टाने काय म्हटले?
दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने असे मत नोंदवले आहे की, “शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती रिव्हॉल्व्हर लवकर लोड करू शकत नाही. हे फार सोपे नाही.” तेंव्हा सरकारी वकिलांनी सांगितले की, त्यावेळी अधिकाऱ्याची बंदूक अनलॉक होती. त्यावेळी न्यायमूर्ती चव्हाण यांनी म्हटले आहे की, “यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. प्रथमदर्शनी यामध्ये काहीतरी गडबड असल्याचे दिसत आहे. सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही कारण त्यासाठी ताकद लागते.”
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण
तत्पूर्वी, सोमवारी (दि.23) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या एन्काऊंटर मध्ये मारला गेला होता. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. आरोपी अक्षय शिंदे याच्या आधीच्या पत्नीने त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. या नवीन प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस त्याला वॉरंटसह घेऊन जात होते. त्यावेळी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली. तसेच त्याने पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी देखील स्वरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे.