अकोला, 12 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाने राज्यातील कथित बनावट उर्दू शाळांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अशा शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नुकतीच अकोला येथील एका उर्दू शाळेत अचानकपणे भेट दिली. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी शाळा संचालकावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. शिक्षकांच्या या तक्रारीवरून संबंधित शाळा संचालकावर कठोर कारवाई करणार असल्याचे प्यारे खान यांनी स्पष्ट केले आहे.
https://x.com/ANI/status/1889386721672081633?t=iAhfpev9EcmxDwL0yWCcVA&s=19
आयोगाचे अध्यक्ष काय म्हणाले?
यावेळी खान यांनी सांगितले की, “काही बनावट शाळा राज्य सरकारकडून अनुदान घेतात आणि अशा शाळा विद्यार्थ्यांना नीट शिक्षण देत नाहीत. अल्पसंख्याक आयोग अशा बनावट शाळांवर छापे टाकत आहे. उलट, या शाळा शिक्षकांकडून जबरदस्तीने पैसे उकळतात, त्यांच्यावर शारीरिक व मानसिक छळ करतात. तसेच शिक्षकांचे लैंगिक शोषण करतात. आम्ही अशा शाळांवर कठोर कारवाई करत आहोत.” असे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटले आहे.
आरोपीविरूद्ध यापूर्वीच 45 गुन्हे
आम्हाला आरोपींविरूद्ध तक्रार मिळाली होती. हा आरोपी त्या संचालक असून त्याच्याविरूद्ध आधीच 45 गुन्हे दाखल असून, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हाही नोंद आहे. तो शिक्षकांना बंदुकीच्या धाकावर धमकावून पैसे उकळत असे. ज्या शिक्षकांनी पैसे देण्यास नकार दिला, त्यांना एका खोलीत कोंडून अमानुष मारहाण करण्यात आली. यात महिला शिक्षकांचाही समावेश आहे, असेही प्यारे खान यांनी यावेळी सांगितले आहे.
https://x.com/ANI/status/1889388653358747812?t=S94EbDYhNKvZ_cbMcDeK4w&s=19
कठोर कारवाईचे निर्देश
खान यांनी स्पष्ट केले की, “सरकारने जर ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकांची भरती केली असती, तर असे प्रकार घडले नसते. बनावट शाळा आणि बोगस भरतीमुळे अनेक शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे.” दरम्यान, या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच, प्यारे खान यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शाळांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, प्यारे खान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी म्हटले आहे.