बारामती, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय मिळवला आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा 1 लाख 899 मतांनी पराभव केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना 1 लाख 81 हजार 132 मते मिळाली. तर युगेंद्र पवार यांना 80 हजार 233 मते मिळाली आहेत.
दरम्यान, बारामती मतदारसंघातील काका विरूद्ध पुतण्याच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्या बाजूने शरद पवारांनी त्यांची ताकद पणाला लावली होती. तसेच त्यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ अनेक सभा घेतल्या होत्या. याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, रेवती सुळे हे पवार कुटुंबीय देखील युगेंद्र पवार यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले होते. तर दुसरीकडे अजित पवारांनी देखील स्वतः मैदानात उतरून बारामती तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. परंतु, या निवडणुकीत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांना मोठ्या फरकाने मात दिली आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1860276206475657372?t=GiG2m-JU2GEW-rJrgl3sSA&s=19
विजयानंतर अजित पवारांचे ट्विट
या विजयानंतर अजित पवार यांनी ट्विट करून बारामतीकरांचे आभार मानले आहेत. “मी महाराष्ट्राच्या जनतेचे आणि विशेषतः माझ्या बारामतीकरांचे हृदयपूर्वक आभार मानतो..!” असे अजित पवारांनी यामध्ये म्हटले आहे. “माझी बारामती आणि मी बारामतीकरांचा हे या विजयाच्या रूपानं सिद्ध झालं आहे. माझं आणि बारामतीकरांचं हे अतूट नातं हे सदैव राहील. बारामतीसह संपूर्ण राज्य हे विकासाच्या पथावर आणखी गतिमान होणार, यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी व पक्षाचा कणा असलेले कार्यकर्ते यांनी निवडणुकीच्या काळात समन्वयानं घेतलेली मेहनत, यामुळे ह्या यशात या सर्वांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो,” असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.