देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया

नागपूर, 08 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे काल विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे आले होते. यावेळी नवाब मलिक हे सभागृहात अजित पवार गटाच्या आमदारांच्या शेजारील बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्याआधी नवाब मलिक हे अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात देखील गेले होते. त्यामुळे नवाब मलिक हे अजित गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत.



तर नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या संदर्भात अजित पवार यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला. “मला फडणवीस यांचे पत्र मिळाले आहे. मी ते पत्र वाचले आहे. नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतरच मी माझी आणि राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट करेन,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, नवाब मलिक हे काल हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहात आले होते. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ज्यांच्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देशद्रोहाचे गुन्हे आहेत असे बोलत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी आता सरकारची काय भूमिका आहे? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *