बारामती, 16 जूनः बारामतीच्या शारदानगर येथील कृषि विज्ञान केंद्रावर सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटरचा आज, गुरुवारी (16 जून) सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाभरातून विद्यार्थी आले होते. हे विद्यार्थी सकाळी दोन तासाहून अधिक काळ त्या ठिकाणीच बसून होते. त्यामुळे नेते मंडळींच्या दीर्घ भाषणांमुळे विद्यार्थ्यांचा गोंगाट वाढू लागला. या गोंगाटातच सारंग साठे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांची भाषणे झाली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण आले. तरीही विद्यार्थ्यांचा गोगाट थांबला नाही. यामुळे शेवटी अजित पवारांनी भर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दम दिला.
अजित पवार म्हणाले की, ‘आता माझं भाषण संपल्यावर साहेबांचं भाषण आहे, जर का कुठल्या विद्यार्थ्यानं तोंडातून शब्द काढलाना तर त्याला बाहेर काढून टाकेन, पोलिसांना सांगेल, एकदम पीन ड्रॉप सायलेंट पाहिजे’
या प्रकारामुळे विद्यार्थी काही काळ शांत बसले, परंतु ते पुन्हा बोलू लागले. मात्र यातून अजित पवार यांची दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, असेच एका कार्यक्रमात कामात अडथळा आणणाऱ्यांना दम दिला होता. कुठल्या कामात अडथळा आणू नका, अन्यथा पोलिसांना सांगून वेगवेगळ्या केसेस टाकून तडीपार करेल, अशीच धमकी भर कार्यक्रमात अजित पवारांनी दिली.