मालवण, 30 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी यावेळी किल्ल्याची पाहणी करून त्याचा आढावा देखील घेतला. याप्रसंगी, खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध अधिकारी आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1829368095699263711?s=19
https://x.com/ANI/status/1829378031489831246?s=19
महाराजांच्या नावाला साजेसा पुतळा उभारण्यात येणार: अजित पवार
शिवराय आपला स्वाभिमान आहेत. तसेच महाराज आपली अस्मिता आहेत. याठिकाणी लवकरच महाराजांचा मजबूत आणि भक्कम तसेच महाराजांच्या नावाला साजेसा असा पुतळा पुन्हा एकदा मानाने उभा राहील, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत असून त्यांच्या इतिहासाचा सर्वांनाच अभिमान आहे. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच ज्यांनी या पुतळ्याचे काम केले ते अजूनही फरार आहेत. त्यांचा सध्या शोध घेतला जात आहे. कुठेही असले तरी ते सापडतील. त्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
https://x.com/ANI/status/1829364358071119920?s=19
या प्रकरणात एकाला अटक
तत्पूर्वी, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला कोल्हापुरातून ताब्यात घेण्यात आले. सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये त्याचे नाव आहे. काल रात्री 12.30 च्या सुमारास कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माग काढत चेतन पाटीलला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे कोल्हापूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार आहे. त्याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.