पुणे, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पुणे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. या पावसामुळे पुणे शहरातील अनेक नागरिकांचे या पुराच्या पाण्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये एकता नगर, विठ्ठल नगर, निंबजनगर, सिंहगड रोड परिसर, वारजे, डेक्कन यांसारख्या भागांतील नागरिकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पुणे शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर बचत व मदत कार्य सुरू आहे.
https://x.com/ANI/status/1816444676888510736?s=19
https://x.com/Info_Pune/status/1816442885820358867?s=19
नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांनी एकता नगर आणि विठ्ठल नगर येथील पूरग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अजित पवारांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. संबंधित अधिकाऱ्यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा, असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले. या नुकसानीचा पंचनामा केल्यानंतर राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1816410255057653761?s=19
अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाची पाहणी करून शहर व जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना शहरातील पूर परिस्थिती हाताळण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन आपत्तीपूर्व उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचाव व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.
दोन दिवस पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी
पुणे शहरातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता, पुढील 48 तास पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. 48 तासानंतर पावसाची परिस्थिती पाहून ही बंदी उठविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. पुणे जिल्ह्यातील या पावसाच्या परिस्थितीत जखमी झालेल्या व्यक्तींचा उपचाराचा संपूर्ण खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्यात येईल, अशी माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच पुणे शहरातील पुराच्या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आज परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा शिक्षण बोर्ड घेईल, असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.