मुंबई, 06, फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. निवडणूक आयोगाच्या या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत! असे अजित पवार यावेळी म्हणाले.
https://twitter.com/mahancpspeaks/status/1754893543498219657?s=19
या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखी वाढली: अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखी वाढली आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच अजित पवार यांनी यावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत त्यांचे आभार मानले.
या निकालावर आम्ही आनंदी आहोत: सुनील तटकरे
निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर आम्ही अतिशय आनंदी आहोत. आयोगाने अत्यंत योग्य वेळी निर्णय देऊन भारतीय लोकशाही सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले, असे सुनील तटकरे यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होताना, राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी होताना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आपली भूमिका योग्यरीत्या बजावेल. यावेळी महाराष्ट्रातील जनतेचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास देखील सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.