बारामती, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 11) पहाटे बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी केली. यामध्ये त्यांनी एमआयडीसी वसतिगृह, बारामती तालुका पोलीस स्टेशन, रस्ते बांधकाम तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली आणि कामांचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सूचना दिल्या.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1877951608488890581?t=D7uq_a6LUpOYBF6b2AY5Cw&s=19
100 दिवसांच्या कार्यक्रमाचे निरीक्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात पुढील 100 दिवसांमध्ये विकासकामांचा कार्यक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत बारामती तालुक्यात विशेष स्वच्छता मोहिम राबवावी, शासकीय कार्यालये आणि परिसर स्वच्छ ठेवावेत, अनावश्यक कागदपत्रे हटवून कार्यालये सुटसुटीत करावीत आणि खराब झालेली वाहने कायमस्वरूपी हटवावीत, असे निर्देश पवार यांनी दिले.
नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबवावे
शासकीय संकेतस्थळे अद्ययावत ठेवून माहिती अधिकार कायद्यानुसार आवश्यक ती माहिती आधीच उपलब्ध करून द्यावी. याशिवाय, नागरिकांना घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा उभारावी, त्यांच्या तक्रारी वेळेत निकाली काढाव्यात, तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह आणि बैठक व्यवस्था यांसारख्या सुविधा कार्यालयांत उपलब्ध करून द्याव्यात, असेही पवार यांनी सांगितले.
सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था
अवैधरित्या मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. घनकचरा व सांडपाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करावे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम दर्जाच्या सेवेसाठी पावले उचलावीत. असंघटित कामगारांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
तंत्रज्ञानाचा वापर करावा
पवार म्हणाले की, वाढत्या नागरीकरणामुळे शहरांमध्ये समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक वृक्षारोपण करणे, पदपथांवरील झाडांच्या फांद्या अडथळा ठरणार नाहीत याची दक्षता घेणे आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण रोखणे आवश्यक आहे.
देखभाल आणि उत्पन्नाचे स्रोत
बारामती शहरात आकर्षक एलईडी फलक आणि दिशादर्शक बोर्ड लावण्यात यावेत. शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या घटकांवर कारवाई करावी आणि पूर्ण झालेल्या कामांची नियमित देखभाल करण्यासाठी नगरपरिषदेला उत्पन्नाचे स्थिर स्रोत तयार करावेत, असेही पवार यांनी सांगितले.