अजित पवार यांच्याकडून राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर, केल्या मोठ्या घोषणा!

मुंबई, 28 जून: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1806606350761545843?s=19

महिलांसाठी महत्वपूर्ण घोषणा

अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. यासोबतच महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई-रिक्षा ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेअंतर्गत राज्यातील महिला लघुउद्योजकांसाठी 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा मिळणार आहे. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण या योजनेअंतर्गत सरकारकडून राज्यातील 54 लाख कुटुंबांना वर्षभरात 3 मोफत एलपीजी गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत, अशी घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा

याशिवाय, अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच दुधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्यात येणार आहे. तर निर्मल वारी साठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. सोबत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.

निराधार, विधवा, दिव्यांग आणि वृद्धांच्या अर्थसहाय्यात वाढ

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृद्ध नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात एक हजारावरून दीड हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा राज्यातील अनेक दुर्बल घटकांना होणार आहे.

विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा

यासोबतच राज्यातील विद्यार्थिनींसाठी या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहेत. ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देण्याची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेल वरील कर कमी

या अर्थसंकल्पात बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोल आणि डिझेल वरील कर कमी करण्यात आला आहे. यामध्ये डिझेलवरील कर 24 टक्क्यांवरून 21 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे डिझेलचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी होणार आहेत. तसेच पेट्रोलवरील कर 26 टक्क्यांवरून 25 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 65 पैशांनी कमी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *