पुणे, 11 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सारसबाग येथील मैदानावर जाहीर सभा पार पडली. काल पुण्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, राज ठाकरेंची सभा नियोजित ठिकाणी आणि वेळेनुसार पार पडली. या सभेतून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सोबतच अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नसल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
https://twitter.com/RajThackeray/status/1789019882400448898?s=19
मग मी पण फतवा काढतो…
जर मौलवी फतवे काढत असतील कि, मुस्लिम समाजाने काँग्रेसला व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा, तर हा राज ठाकरे फतवा काढतो कि समस्त हिंदू बंधू व भगिनींनी भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या महायुतीच्या उमेदवारांनाच मतदान करा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी यावेळी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. जे सुज्ञ मुसलमान आहेत ते फतव्यांना जुमानत नाहीत पण काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फतवे निघत आहेत. मुस्लिम समाजाला तुम्ही काय गुरं-ढोरं समजता का? त्यांना स्वतःचा विवेक नाही का? त्यांनाही समजतंय कोण आपल्याला वापरून घेत आहेत, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
या निवडणुकीत मुद्दाच शिल्लक नाही
“मला जेव्हापासून राजकारण उमगायला लागलं, तो आणीबाणीचा काळ होता. त्यानंतर अनेक लोकसभेच्या निवडणूक झाल्या. प्रत्येक लोकसभेला आणीबाणी विरोध, इंदिरा गांधींची लाट, बोफोर्स भ्रष्टाचार, बाबरी मशीद-हिंदुत्व, महागलेला कांदा, मग काँग्रेसचा भ्रष्टाचार, नरेंद्र मोदींची लाट, पुलवामा हल्ला असे कोणते ना कोणते मुद्दे होते. 2024 ची पहिली अशी निवडणूक आहे ज्या निवडणुकीला मुद्दाच शिल्लक नाही. त्यामुळे भलत्याच मुद्द्यांमध्ये मतदारांना गुंतवलं जात आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.”
अजित पवारांसोबत मतभेद पण…
“माझे अजित पवारांसोबत अनेक मतभेद असतील. पण एक गोष्ट निश्चित सांगतो कि, शरद पवार साहेबांसोबत असतानाही अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही,” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार ह्यांच्याशी माझे काही मुद्द्यांबद्दल मतभेद आहेत ते राहणार. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं अभिनंदन देखील मी जाहीर करणार, असे राज ठाकरे यांनी या सभेतून म्हटले आहे.