अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

दिल्ली, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (दि.12) 85 वा वाढदिवस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी शरद पवारांची दिल्लीतील जनपथ-6 या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याप्रसंगी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी सर्वच नेत्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही चर्चा कौटुंबिक असून त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, संगण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवारांनी आज अचानकपणे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

https://x.com/ANI/status/1867059964621230205?t=TA3QAt9mhKEpCjSD_jVN6Q&s=19

अजित पवारांची प्रतिक्रिया

आज साहेबांचा वाढदिवस होता. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोघांचे दर्शन घेण्यासाठी तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. असे अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. तसेच आम्ही त्यांचे दर्शन घेतले आणि चहापाणी नाष्टा झाला. यावेळी आमच्यात जनरल चर्चा झाल्या. लोकसभेत आणि राज्यसभेत काय चालू आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे? अधिवेशन कधी होणार आहे? यांसारख्या जनरल चर्चा यावेळी झाल्या असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. याव्यतिरिक्त राजकीय विषयांवर कसलीही चर्चा झाली नाही. शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तिथे आलो होतो, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1867039630694158507?t=6j-vGfi9ldDIv7UmyASUlw&s=19

अजित पवारांच्या सोशल मीडियावरून शुभेच्छा

दरम्यान, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सध्या राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजित पवार यांनीही आज सकाळीच शरद पवारांची भेट घेण्यापूर्वी त्यांना सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवारांचा फोटो शेअर केला होता. “आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा,” असे अजित पवारांनी या पोस्टमध्ये लिहिले होते. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत असून, त्यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *