मुंबई, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. त्यामूळे अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना का हजेरी लावत नाहीत? याचे कारण स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.29) ट्विट एक केले आहे.
मराठा आरक्षणसंदर्भात सरकार बैठक घेणार
“अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसल्याच्या प्रश्नांना आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांबाबत, मी स्पष्ट करू इच्छितो की, अजित पवारांना कालच डेंग्यू झाल्याचे समजले. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल. त्यांना सध्या वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. श्री.अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. ते एकदा पूर्णपणे बरे झाले की, पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमांत पूर्ण ताकदीने सहभागी होतील”, असे प्रफुल्ल पटेल यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गतविजेत्या इंग्लंडशी आज टीम इंडियाचा सामना
तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी झाले नव्हते, त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तसेच यासंदर्भात माध्यमांमध्ये विविध अंदाज व्यक्त करण्यात येत होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या या ट्विटमुळे अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबतीत बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक आकडेवारी जाहीर केली होती. त्यानूसार, मुंबईत सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे 1360 रुग्ण आढळले होते. तसेच ऑगस्ट महिन्यात याठिकाणी 1000 रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर, बीएमसीच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी औषध फवारणी केली जात आहे.
One Comment on “अजित पवारांना डेंग्यूची लागण”