अजित पवारांच्या आज इंदापूर तालुक्यात तीन सभा पार पडल्या, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकाच मंचावर

सणसर, 02 मे: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकी येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभा पार पडल्या. या सभेच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे हे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

नेत्यांचा सेल्फी व्हायरल

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे हे नेते आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी इंदापूर तालुक्यातील सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकी या 3 गावांमध्ये महायुतीच्या जाहीर सभा पार पडल्या. विशेष म्हणजे या प्रचारदौऱ्यात अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे या नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत सोनाई उद्योग समुहाचे प्रवीण माने हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी ह्या सर्व नेत्यांनी एकत्रित सेल्फी देखील काढला. त्यांच्या या सेल्फीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद सर्वांना ठाऊक आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांमधील वाद मिटवला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरातील कार्यकर्ता मेळाव्यातून भाजप कार्यकर्त्यांची नाराजू दूर केली होती. तेंव्हापासून हर्षवर्धन पाटील हे सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. या प्रचार दौऱ्यात हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यातील गावांना भेटी देत आहेत. तसेच ते यावेळी या गावांतील लोकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *