नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) शरद पवार यांना आज निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निर्णय दिला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यामध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला आता राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या निवडणूकीत शरद पवार गटाला आता नवीन पक्षाचे नाव आणि चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
https://x.com/ANI/status/1754868297076449649?s=20
निवडणूक आयोगाचा शरद पवारांना धक्का
काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून महायुती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सोबतच राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना मंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच अजित पवार गटाने देखील राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्या याचिकांवर निवडणूक आयोगासमोर अनेकदा सुनावणी झाली. याप्रकरणी निवडणूक आयोगाने आज निकाल जाहीर केला. यावेळी त्यांनी अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे.
6 महिन्यांत 10 हून अधिक वेळा सुनावणी झाली होती
निवडणूक आयोगासमोर याप्रकरणाचा वाद 6 महिन्यांहून अधिक काळ चालला होता. यामध्ये 10 पेक्षा जास्त वेळा सुनावणी झाली. यावेळी शरद पवार आणि अजित पवार गटाने सादर केलेल्या अनेक कागदपत्रांची निवडणूक आयोगाने छाननी केली. त्यानंतर निवडणूक आयोग या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. तर या निर्णयामुळे मात्र शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह गमवावे लागले आहे.