लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

बारामती, 28 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज (दि.28) बारामती मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत अजित पवार यांचा सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी, त्यांचे पुत्र पार्थ पवार उपस्थित होते.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1850802039636316351?t=SBi-HhPTnekCoC3SckFMDw&s=19

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1850822729944985969?t=HkPvqFubCzQOUg9ugf999g&s=19

अजित पवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवार यांचे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. याप्रसंगी, अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या बहिण उपस्थित होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी बारामती शहरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर अजित पवार यांची बारामती शहरात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी अजित पवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ही रॅली कसबा ते बारामती प्रशासकीय भवन याठिकाणी पार पडली. या रॅलीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान, अजित पवार यांची ही आठवी विधानसभा निवडणूक आहे. गेल्या सात निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अजित पवार यांनी सर्वप्रथम 1991 मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली होती. अजित पवार यांनी सलग सात वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 1 लाख 65 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे युगेंद्र पवार यांना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *