‘नीट’ परीक्षा संदर्भात अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली

सरकारी योजना अर्थमंत्री अजित पवार

मुंबई, 29 जून: (विश्वजीत खाटमोडे) यावर्षी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. सोबतच नीट परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, या संदर्भातील मागणी ही विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून केली जात आहे. तसेच या घोटाळ्याच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. दरम्यान, नीट परीक्षेतील घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1806948206464450625?s=19

अजित पवार काय म्हणाले?

नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. या कायद्यानुसार, दोषींवर कठोर कारवाईसह मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेची जबाबदारी पूर्वीप्रमाणे राज्यांकडे सोपविण्याचा विचारही पुढे आला. केंद्र सरकार त्यासंदर्भात तपासणी करून निर्णय घेणार आहे. दिवसरात्र अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासन बांधिल असून यासंदर्भात विरोधी पक्षांनी सूचविलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

https://x.com/VijayWadettiwar/status/1806954921331466506?s=19

नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून विजय वडेट्टीवार आक्रमक

तत्पूर्वी, नीट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचारावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत राज्य सरकारला जाब विचारला. नीट परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी का घेत नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच या परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. राज्यात मोर्चे निघत आहेत. नांदेडमध्ये 15 हजार विद्यार्थी रस्त्यावर आले होते, तरी सरकार काही बोलायला तयार नाही. राज्य सरकारने या परीक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. भविष्यात बोगस डॉक्टर लोकांच्या आरोग्याशी खेळ करतील, त्यासाठी पूर्णतः आजचे महायुतीचे सरकार जबाबदार असतील, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *