मुंबई, 15 जून: (विश्वजीत खाटमोडे) श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधान भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे यांसारख्या नेत्यांसह विविध प्रशासकीय अधिकारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1801613656083546415?s=19
या पालखी सोहळ्यादरम्यान शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. तसेच पालखी सोहळ्यासाठी फिरत्या शौचालयाची आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करावी. राज्य सरकारकडून या पालखी सोहळ्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. परंतु हा निधी प्राप्त होईपर्यंत या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पालखी सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडावा, यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. राज्य सरकारचे सर्व विभाग सकारात्मक राहून हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
या बैठकीत अजित पवार यांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करावी. या सोहळ्याच्या दृष्टीने पालखी मार्गाच्या शेजारी असणाऱ्या जागा कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. तसेच अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी. सोबतच हा पालखी सोहळा पार पडल्यानंतर पंढरपूर शहरातील स्वच्छतेसाठी आवश्यक ते नियोजन करावे, यांसारखे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय, आषाढी वारी सोहळ्यादरम्यान दुर्घटना घडल्यास राज्य सरकारतर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.