मुंबई, 12 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबाराच्या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संदर्भात अजित पवार यांनी ट्विट केले आहे. गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी असून, या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे अजित पवार यांनी यामध्ये म्हटले आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1845162849095778695?t=k8za6EqLH7u3fTCN4s2mbQ&s=19
अजित पवार यांचे ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असे अजित पवार म्हणाले आहेत.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
शनिवारी रात्री घडली घटना
दरम्यान, शनिवारी (दि.12) रात्री साडेनऊच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. वांद्रे परिसरात ही घटना घडली. त्यानंतर या घटनेत जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर अजून एक आरोपी सध्या फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.