मुंबई, 28 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर 8 महिन्यातच कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेची माफी मागितली आहे. गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. महाराजांचा तो पुतळा कोसळल्याची घटना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींप्रमाणे माझ्यासाठी देखील अतिशय क्लेशदायक आहे. मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो, असे मुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1828761381258121467?s=19
संबंधितावर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल: अजित पवार
युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. आणि या दैवतांचा पुतळा एका वर्षाच्या आत अशा प्रकारे कोसळणे ही सर्वांना धक्का देणारी बाब आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. महाराजांचा पुतळा उभारताना तेथील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान यासारख्या महत्वाच्या बाबींचा वैज्ञानिक अभ्यास केला होता का? पुतळा बनवण्याच्या सामग्रीची गुणवत्ता याचा शोध घेत संबंधित जबाबदार लोकांची राज्य सरकारने तातडीने चौकशी करत गुन्हे देखील दाखल केले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लवकरात लवकर राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली जाईल, सोबतच अशाप्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या प्रत्येक संबंधितावर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.
कंत्राटदार, स्ट्रक्चरल कन्सल्टंट विरूद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा सोमवारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण डिसेंबर 2023 मध्ये करण्यात आले होते. याप्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109, 110, 125, 318 आणि 3(5) अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच यासंदर्भात विरोधकांकडून विविध आंदोलने केली जात आहेत.