अजित पवार आणि युगेंद्र पवार आज एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार

बारामती, 28 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरूद्ध पुतण्या अशी लढत पहायला मिळणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे काका पुतण्याच्या या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार आणि युगेंद्र पवार हे त्यांचा उमेदवारी अर्ज आजच (दि.28) दाखल करणार आहेत.

https://x.com/ANI/status/1850760200162046300?t=pXdIhs6DQvUWSqPISv2ENA&s=19

https://x.com/ANI/status/1850775098736963913?t=BboiJqjz2kV8KnGQPqVe2w&s=19

युगेंद्र पवार अर्ज साध्या पद्धतीने अर्ज भरणार

दरम्यान, युगेंद्र पवार हे साध्या पद्धतीने त्यांचा उमेदवारी अर्ज करणार दाखल करणार आहेत. युगेंद्र पवार हे आज सकाळी बारामती तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार आणि आई शर्मिला पवार हे उपस्थित राहणार आहेत.

https://x.com/ANI/status/1850774152640442513?t=c81KqEdlYbblpF4RtjbHVg&s=19

अजित पवारांकडून मोठे शक्तिप्रदर्शन

तर दुसरीकडे, उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्याकडून यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार हे सर्वप्रथम बारामती शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर अजित पवारांची कसबा चौकातून रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली पार पडल्यानंतर अजित पवार हे आज दुपारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

बारामतीत पवार विरूद्ध पवार सामना

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात कोणता उमेदवार लढणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यानुसार, यंदाच्या विधानसभेला अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात नणंद विरूद्ध भावजय अशी लढत झाली होती. या निवडणुकीकडे राज्याचे नव्हे तर अख्ख्या देशाचे लक्ष लागले होते. लोकसभेच्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. तर या विधानसभा निवडणुकीत बारामतीत आपल्याला आता काका विरूद्ध पुतण्या असा सामना पहायला मिळणार आहे. ही लढत दोन्ही पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बारामतीकर यावेळेस कोणत्या पवारांच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *