तिरंगी लढतीसाठी अजितदादांना बळीचा बकरा केलं जातंय, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

मुंबई, 19 जून: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात तिरंगी लढत होण्यासाठी भाजप अजित पवार यांना बळीचा बकरा करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केवळ अजित पवार यांच्यामुळे झाला नाही, तर भाजपच्याच शेतकरी आणि युवा विरोधी धोरणांमुळे झाला आहे, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, रोहित पवारांच्या या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1803325494903054673?s=19

रोहित पवारांनी काय म्हटले?

“राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजित पवार यांना बळीचा बकरा करण्यात येत असून, आधी आरएसएस च्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधींना जागे करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे,” असे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपचा पराभव अजितदादांमुळे नाही…

“परंतु मुळात भाजपचा पराभव केवळ अजित पवार यांच्यामुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *