रत्नागिरी, 13 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रत्नागिरी येथील जयगड जिंदाल कंपनीमध्ये वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरूवारी (दि.12) घडली. या वायुगळतीमुळे एकूण 59 शाळकरी मुलांना त्रास झाला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. रत्नागिरीतील जिंदाल कंपनीच्या थर्मल पॉवर प्लांटमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे जयगड विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. या घटनेत विद्यार्थ्यांना डोळ्यांची जळजळ, अस्वस्थता, मळमळणे, उलट्या यांसारखा त्रास जाणवू लागला.
https://x.com/PTI_News/status/1867171881075515532?t=20h_TeIzSIvQmuNjNtUkWw&s=19
59 मुले आणि एक महिला बाधित
हे सर्व विद्यार्थी जिंदाल कंपनीच्या प्लांटजवळील जयगड विद्या मंदिर शाळेतील आहेत. टाकी साफ करताना निघणाऱ्या धुरामुळे शाळेतील 59 मुले त्याचबरोबर एक महिला यांना त्रास होऊ असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
कशी घडली घटना?
जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना वायूगळती झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेत. या टाक्या क्लिनिंगचे काम सुरू असताना त्यातून विषारी द्रव्ये बाहेर पडली आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र कंपनीकडून यासंदर्भात कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान ही वायूगळती नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या प्रशासनाकडून केला जात आहे.
गेल्या आठवड्यातही वायुगळती
दरम्यान, मागील आठवड्यात रत्नागिरी परिसरात सीएनजी वाहतूक करणाऱ्या एका टँकरमधून वायुगळती झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी टँकर चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन ही वायुगळती रोखली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.